Maharashtra Weather Update : मार्चमध्ये उष्णतेच्या लाटा; एप्रिल–मे धगधगणार? यंदाच्या उन्हाळ्याचा अंदाज जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मार्च २०२६ ।। रोजी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या (मार्च ते मे) उन्हाळ्यात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी शनिवारी (ता. २८) हंगामी तापमानाचा आढावा सादर केला. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा वाढल्याचे दिसून आले. देशातील सरासरी किमान तापमान १४.७६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे १९०१ पासूनच्या नोंदीत तिसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान ठरले. यापूर्वी २०२५ मध्ये १५.०२ अंश सेल्सिअस आणि २०१६ मध्ये १४.९१ अंश सेल्सिअस अशी नोंद झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मार्च महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरी ते किंचित कमी राहू शकते, त्यामुळे सुरुवातीला उष्णतेच्या लाटा तुलनेने कमी असतील. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकचा उत्तर भाग आणि तमिळनाडू येथे तीव्र उष्ण लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मार्चमध्ये गुजरात आणि लगतच्या महाराष्ट्राच्या काही भागांत २ ते ५ दिवस उष्णतेच्या लाटा येऊ शकतात. विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे; तर उत्तर कोकण व उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

दरम्यान, विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या सौम्य ‘ला-निना’ स्थिती सक्रिय असून मार्च ते मेदरम्यान ती निवळण्याची शक्यता आहे. पुढील काळात तटस्थ ‘एल-निनो’ स्थिती राहण्याचे संकेत आहेत, तर मॉन्सून हंगामाच्या मध्यावर ‘एल-निनो’ विकसित होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल सध्या तटस्थ स्थितीत असून पुढील हंगामातही ती कायम राहू शकते. एकूणच मार्च तुलनेने सुसह्य असला तरी एप्रिल–मे महिन्यात उष्णतेचा चटका अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *