पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा ” – आमदार अण्णा बनसोडे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड-    अवैधधंद्यांतून पठाणी वसुली सुरु असून करोनाच्या महामारीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे जोमात सुरू आहेत. शहरातील कानाकोपऱ्यात मटका, जुगार, पत्यांचे क्लब, मसाज सेंटरच्या नावाखाली चालणारा वेश्या व्यवसाय, गुटखा व अवैध दारू विक्रीचे धंदे, हुक्का पार्लर असे धंदे दिवसाढवळ्या चालविले जात आहेत.


शहरात या अवैध धंद्यांची दिवसाची उलाढाल ही काही लाखांमध्ये असून, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर या धंद्यांमध्ये वाढ होत राहिली आहे. प्रत्येक पोलिस ठाणे, गुन्हेशाखा यांच्याकडून या धंद्यांवरून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याने त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नाही. ओरड झाल्यास दिखावू स्वरूपाची कारवाई करून पुन्हा मागील दाराने हे उद्योग सुरूच असल्याने कष्टकरी-कामगार जनतेच्या खिशातून पैशांची लूट केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित परिसरात ६० मटका-जुगार तर ५५ ठिकाणी स्पा (मसाज सेंटर यातील निम्मे थेट वेश्या व्यवसाय) चालविले जात आहेत.
लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. शहरातील जनता ही हातावर पोट असलेली कामगार-कष्टकरी असून, त्यांच्याकडून या अवैध धंद्यांच्या रूपाने पठाणी वसुली केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, या असल्या भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळे सरकारची जनमानसातील प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे या अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिस आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. आयुक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांना ‘अवैध धंदे बंद ठेवा’ अशा सूचना देतात आणि वसुली तर सुरू ठेवतात असा सर्व कारभार सध्या सुरू आहे. ‘मी करतो मारल्या सारखे, तू कर रडल्यासारखे’ असा ड्रामा आयुक्तालयात सुरु आहे. त्यामुळे ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका-जुगार स्पा-वेश्या व्यवसायासारखे अवैध प्रकार सुरू आहेत, त्या पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांवरच कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर त्याला पाठबळ देणाऱ्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची येथून उचलबांगडी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलाकडे भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून पाहिले जात असून, त्यामुळे निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त हे येथे नियुक्ती मिळविण्यासाठी धडपडताना दिसून येतात. म्हणून याबाबत कारवाई करण्याची मागणी थेट उपमुख्यमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री यांच्याकडे आमदार बनसोडे यांनी पत्राद्वारे मागणी केली असून गृह मंत्री व पोलीस महासंचालक यांनाही email द्वारे कळविले आहे. शहरात पोलिस ठाणे निहाय मटका-जुगार आकडेवारी वाकड – ८ सांगवी – ४ हिंजवडी – ५ चिखली – २ निगडी – २ चिंचवड – २ भोसरी – ७ दिघी – ४ आळंदी – ३ चाकण – ३ म्हाळुंगे – ४ देहूरोड – ४ तळेगाव दाभाडे – ४ पिंपरी – २ रावेत – २ तळेगाव एमआयडीसी – १ भोसरी एमआयडीसी – ३ अशी शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांची यादीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर निवेदनासोबत दिली आहे. शहरात सुरु असलेले अवैद्य धंद्यामुळे गुन्हेगारी वाढत असून ग्न्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी होते असून पठाणी हप्ते वसुली करण्यात पोलीस यंत्रणा मग्न असल्याने शहरातील प्रतिष्टीत व गरीब मध्यम वर्गीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले असल्याने हे अवैद्य व्यासाय तातडीने बंद व्हावेत अशी मागणी बनसोडे यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात आहे. तरुणांचा रोजगार गेलेला असून शहरातील तरून भरकटून व्यसनाधीन होऊ नये तसेच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी योजना आखली असून तरुणांनी व्यसनाधीनता रोखून त्यांना योग्य व्यवसाय आणि रोजगार मिळावा म्हणून लवकरच एका लिंक द्वारे नोकरीची गरज असणाऱ्याकडून अर्ज मागविणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *