![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मार्च २०२६ ।। जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात मोठी उलथापालथ सुरू असून सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. Israel, Iran आणि United States यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक आर्थिक वातावरण अस्थिर झाले आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची घसरण झाली असून चांदी तब्बल १० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी सध्या सोनं-चांदी खरेदी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
मार्चच्या सुरुवातीला सोन्याचा भाव प्रतितोळा सुमारे १ लाख ६० हजार रुपयांच्या आसपास होता. मात्र गेल्या काही दिवसांत बाजारात सतत चढ-उतार होत राहिल्याने दरात घसरण झाली आहे. ९ मार्च रोजी सोन्याचा दर प्रतितोळा सुमारे १ लाख ६० हजार रुपये होता, तर १६ मार्चला तो १ लाख ५६ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. ९ मार्चला एक किलो चांदीचा दर सुमारे २ लाख ६६ हजार रुपये होता, तो आता २ लाख ५६ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. सराफा बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांच्याही नजरा बाजाराकडे लागल्या आहेत.
दरम्यान, आगामी Gudi Padwa जवळ येत असल्याने सोन्याच्या खरेदीला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवशी सोनं खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे दरातील सध्याची घसरण ही ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. पुढील काही दिवसांत जागतिक घडामोडींवर बाजाराचे भवितव्य अवलंबून असणार असून सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होईल की घसरण कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
