महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। वसंत मोरे हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यांसदर्भात माहिती देताना सांगितलं की, वसंत मोरे ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील. वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
वसंत मोरे यांना पुण्यातून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. मात्र, तरी त्यांचा पराभव झाला होता. आता ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. आज ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ही भेट होईल. याचवेळी त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, वसंत मोरे आमच्याकडे येत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, हडपसर किंवा खडकवासला या विधानसभा मतदारसंघातून त्यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकतं. वसंत मोरे यांनी हडपसर विधानसभेची मागणी केली आहे. आज मोरे उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. यावेळी वसंत मोरे मोठा निर्णय घेऊ शकतात.