झिकाचा वाढतोय धोका, राज्यात आठ रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुलै ।। राज्यात गेल्या दोन महिन्यांत झिकाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो.

पुण्यात सहा तर कोल्हापूर आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशा आठ झिकाबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. एडिस डास सहसा दिवसा चावतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांसाठी जारी केल्या आहेत. झिकावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.

झिकाचा प्रसार कशामुळे होतो?
लैंगिक संपर्काद्वारे
गर्भधारणेदरम्यान
आईपासून गर्भापर्यंत संक्रमित होतो.
रक्त आणि रक्त उत्पादनांचे संक्रमण
अवयव प्रत्यारोपणाद्वारे

निदान कुठे होते?
राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे तसेच व्हीआरडीएल प्रयोगशाळा नागपूर, मिरज, सोलापूर, अकोला व छ. संभाजीनगर येथे झिकाच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे.

उपचार काय?
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
तापाकरिता पॅरासिटामॉल घ्यावे.
ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना
झिकाबाधित गर्भवतींवर लक्ष ठेवावे. त्यांची सतत तपासणी करावी.
रुग्णालयांनी आपली संकुले एडिसमुक्त ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी.
राज्यांनी निवासी भाग, कामाची ठिकाणे, शाळा, बांधकामांच्या जागा, संस्था या ठिकाणी आरोग्य सुविधा बळकट कराव्या.
रोगवाहक सूक्ष्मजीव प्रतिबंधक उपक्रम अधिक जास्त प्रमाणात राबवावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *