महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने रविवारपासून अक्षरशः थैमान घातले आहे. रायगड किल्ले परिसरात काल सायंकाळी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे इतिहासात प्रथमच किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळ विक्राळ स्वरुपात पाणी वाहू लागल्याने किल्ल्यावर आलेले पर्यटक अडकले होते. सुदैवाने हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. परंतु ही अचानक उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग बंद करण्याचा मोठा निर्णय महाड तालुका प्रशासनाने घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
किल्ल्याच्या महादरवाज्यातून आणि पायरी मार्गावरून पाणी वाहू लागल्याने अनेक शिवभक्त पर्यटक अडकले होते, मात्र सर्व जण सुदैवाने थोडक्यात बचावले आहेत.
किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढगफुटी प्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वाहते, त्याप्रमाणे अतिशय अक्राळ विक्राळ पद्धतीने पायरी मार्गावरून पाणी वाहत होते.