CM Ladki Bahin Scheme: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१० जुलै ।। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojna) माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना राज्य सरकार महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत आहे.

सुरुवातीला या योजनेच्या पात्रतेचे नेमके निकष काय यावरुन बराच गोंधळ उडाला होता. आता कुठे याबाबत स्पष्टता आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार, याचे वेध लागले आहेत. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्यापासूनचे पैसे येणार आहेत. परंतु, अजूनही अर्ज भरण्याचीच प्रक्रिया सुरु असल्याने योजनेचे पैसे कधी मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे 15 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला 15 जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे पाहून राज्य सरकारने (Maharashtra Government) या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, त्यावरुन 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तर 1 ऑगस्टला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. नारीशक्ती अॅपवरही अर्ज भरता येईल. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *