Bhushi Dam Lonavala : लोणावळ्यातील भुशी डॅमवर पर्यटकांची तुफान गर्दी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केलंय. सध्या मुंबईसह कोकणातील घाटामाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने हजेरी लावली असून पर्यटकांचं आकर्षण असलेला भुशी डॅम ओव्हरप्लो झालाय. त्यामुळे वीकेंडला पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भुशी धरणावर गर्दी करत आहेत.

मात्र, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्ग सौदर्याचा आनंद घेण्याच्या नादात काहीजण आपला जीव धोक्यात घातल आहेत. भुशी डॅमवर पर्यटकांच्या झालेल्या गर्दीचा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत.

अगदी दोन आठवड्यापूर्वी भुशी डॅमवर मोठी दुर्घटना घडली होती. एकाच कुटुंबातील ५ जण पाण्यात वाहून गेले होते. यानंतर भुशी डॅम परिसरात पर्यटकांना येण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा भुशी डॅम हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

या गोष्टीचा काही पर्यटकांनी धडा घेतलाय. आपल्या कुटुंबासहित आलेले पर्यटक अगदी सावधगिरीने भुशी डॅम परिसरात वावरत आहेत. तर दुसरीकडे काही हुल्लडबाज पर्यटक अजूनही पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊन सेल्फी तसेच फोटो काढताना दिसून येताहेत.

या पर्यटकांचा तत्काळ बंदोबस्त करायला हवा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. पर्यटकांचं आकर्षण असलेलं पर्यटनस्थळ म्हणून भुशी डॅमची ओळख आहे. राज्यातील अनेक भागातून या ठिकाणी पर्यटक येत असतात. दरवर्षी भुशी धरण भरण्याची पर्यटक वाट पाहत असतात.

गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. इथून पुढे काही डॅम परिसरात पर्यटकांची आणखीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त आणखीच वाढवायला हवा, अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *