Monsoon : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; हवामान खात्याने दिला ‘ऑरेंज अलर्ट’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या मुसळधार सरी पडत असून, पुढील दोन दिवसांमध्ये पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे घाटमाथ्यासह शहरातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आली.

शनिवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे ३७ मिलिमीटर पाऊस पडला होता. सर्वाधिक पाऊस लोणावळा येथे २४१.५ मिमी कोसळला. शहरातील एनडीए भागात ५६.५ आणि पाषाणमध्ये ३८.५ मिमी पावसाची नोंद झाली.

रविवारी पहाटेपासून सरींवर सरी पडत होत्या. शिवाजीनगर येथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १६.६ मिमी पाऊस नोंदला.

जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही भागात सोमवार (ता. १५) आणि मंगळवारी (ता. १६) अतीमुसळधार पावसाच्या सरी पडणार आहेत. तसेच, सपाट भागावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडणार असल्याने हवामान खात्याने पुणे जिल्ह्याला दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणात २ जुलैला ४.५५ टीएमसी पाणीसाठा होता. रविवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तो १०.१२ टीएमसीपर्यंत वाढला असल्याची माहिती मिळाली.

पावसाचा अंदाज

सोमवार (ता. १४) : संततधार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस.

मंगळवार (ता. १५) : आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाचा इशारा.

कुठे, किती पाऊस पडला? (रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पडलेला पाऊस. आकडे मिलिमीटरमध्ये)

वडगाव शेरी – २६

शिवाजीनगर – १६.६

चिंचवड – १६.५

मगरपट्टा – १२

पाषाण – १०.७

दापोडी – ९.५

एनडीए – ५.५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *