पोलीस दलातील 10 हजार जागा भरणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकश भांगे – मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्यासोबतच पोलीस दलावरील सध्याच्या कोरोना संकट आलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्य पोलीस दलातील 10 हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना याचा फायदा होईल, त्याचबरोबर पोलीस दलात सेवेची त्यांना संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगितले. मंत्रालयातील दालनात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसुल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव बैठकीत गृह विभागाकडून मांडण्यात आला होता. पण त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. भरतीप्रक्रियेची कार्यवाही मंत्रिमंडळ मंजूरीनंतर वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत राज्यात 10 हजार पोलिस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. 1384 पदे या बटालियनसाठी निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील महिलांची सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमिन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील युवक, युवतींना आजच्या या निर्णयांमुळे पोलीस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलेच, त्याचबरोबर पोलीसांवरील ताण कमी होण्यास, तसेच कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *