महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकश भांगे -पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी संशयितांच्या घशातील द्रावाची तपासणी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू झाली आहे. या आरटीएफसीआर स्वॅब टेस्टिंग लॅबचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते झाले.
गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टिंग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे. दररोज 350 ते 400 स्वॅब टेस्टिंग इतकी लॅबची क्षमता आहे. यामुळे संशयित रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल, अशी माहिती महापौर ढोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अँटिजेन किट उपलब्ध झाले आहेत. त्याद्वारे कोरोनाची लक्षणे असणारे तसेच, कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या सुमारे एक लाख व्यक्तींची चाचणी होणार आहे. अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटांत या संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की, नाही याची माहिती मिळणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या रुग्णांची रोजची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी पद्धतीत रुग्णाच्या घशातील किंवा नाकातील स्त्रावाचे परीक्षण केले जाणार आहे. या अतिविशिष्ट किटद्वारे रुग्णांचे निदान 25 ते 30 मिनिटांत होऊन रुग्णाचा अहवाल मिळणार आहे.
महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉटमधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच, ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत. उदा. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे-यकृत-मूत्रपिंडे अशा अवयवांचे दीर्घकालीन गंभीर आजार, गरोदर स्त्रिया, वयोवृद्ध व्यक्ती, एचआयव्ही बाधित, कर्करोगाची केमोथेरपी घेणारे, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप, दम लागणे अशी फ्लूसदृश लक्षणे आहेत, अशा व्यक्ती तसेच जे रुग्ण कोरोना विषाणूच्या आजाराने बाधित आहेत. अशांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची या किटद्वारे चाचणी करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे.
