महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। पंढरपूर – तासन्तास श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना अवघ्या दोन तासात विठुरायाचे दर्शन मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. येत्या कार्तिकी यात्रेला प्रयोगिक तत्त्वावर विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
या नव्या दर्शन सुविधेमुळे लाखो वारकरी भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यास मंदिर समितीला परवानगी दिली आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. येथे दररोज किमान ४५ ते ५० हजार भाविक दर्शनासाठी येतात. पदस्पर्श दर्शनासाठी ८ ते १० तास दर्शन रांगेत उभे राहावे लागते. वारीकाळात तर याहून अधिक वेळ रांगेत उभे राहावे लागते. दर्शन रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी राज्य सरकारकडे दिला होता. त्यानंतर पुढे मात्र यावर निर्णय घेण्यात आला नव्हता.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर मुख्यमंत्री १४ जुलै रोजी यात्रा तयारीची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात आले असता, त्यांना टोकन दर्शन व्यवस्थेचे सविस्तर प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले होते.
आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. टोकन दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यालाही मंजुरी दिली आहे. टोकन दर्शन व्यवस्थेमुळे लाखो भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता येणार आहे.
अशी असेल दर्शनाची सुविधा
गोपाळपूर रोडवरील सध्याच्या दर्शन पत्राशेडच्या जागेत भव्य दर्शन मंडप उभारला जाणार आहे. एकाच वेळी सुमारे १६ हजार भाविक बसू शकतील, असा मोठा प्रशस्त सर्व सोयीनियुक्त असा हॉल असेल. या ठिकाणी दिव्यांगासाठी विशेष सोय निर्माण करून दिली जाणार आहे. हॉटेल, दवाखाना, वॉशरुम, रुग्णवाहिका आदींसह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
याशिवाय टोकन घेतलेल्या प्रत्येक भाविकाला दर्शनाची वेळ आणि लागणारा अवधी सांगणारा बेल्ट दिला जाईल. त्यामुळे भाविकांना आपल्या दर्शनाची वेळ अचूक समजणार आहे. टोकन दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांना किमान दोन तासामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन शक्य होणार आहे.
लाखो भाविकांना मोठा दिलासा देणारी टोकन दर्शन व्यवस्था सुरू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. प्रस्तावित टोकन दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपयांच्या निधी देण्यास देखील त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकर तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शन व्यवस्था सुरू होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना किमान दोन तासामध्ये विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी ही योजना मांडली होती. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर टोकन दर्शन व्यवस्थेला मान्यता मिळाली आहे.
– गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर)