महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै ।। जवळपास महिन्याभरापासून टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली आहे. बाजार समितीत टोमॅटो ६० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात शंभरीपार गेला असून, दर्जाही घसरला आहे. बाजारात टोमॅटोसह भेंडी, गवार, दोडका, गिलकेही महागले आहेत. एकीकडे फळभाज्यांच्याही दरांत वाढ होत असतानाच दुसरीकडे पालेभाज्या आणि हिरवी मिरचीचे दर घसरले असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची आवक कमी झाली असून, बाजारपेठेत दाखल झालेला टोमॅटो मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यासह परराज्यांत पाठविला जात आहे. परिणामी, भाजी विक्रेत्यांनाही टोमॅटो मिळेनासा झाला आहे. उत्तम गुणवत्ता असलेला टोमॅटो परराज्यांत पाठविला जात असल्याने स्थानिक बाजारात दुय्यम गुणवत्ता असलेले टोमॅटो उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला शंभर ते १२० रुपये किलोचा दर मिळत आहे. बाजारात टोमॅटो आणि इतर फळभाज्या महागलेल्या असतानाच हिरवी मिरचीचे दर मात्र घसरले आहेत. बाजार समितीत पंधरा दिवसांपूर्वी हिरव्या मिरचीला शंभर रुपये किलोचा दर मिळत होता. सद्यस्थितीला हाच दर २० ते ३० रुपये किलो आहे.
कोथिंबीरही स्वस्त
पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीत कोथिंबीरच्या दरांनीही उच्चांक गाठला होता. बाजार समितीत कोथिंबीरची मोठी जुडी १६० रुपयांपर्यंत पोहोचलेली असताना आता इतर पालेभाज्यासह कोथिंबीरही स्वस्त झाली आहे. बाजार समितीत कोथिंबीरची मोठी जुडी ३० रुपयांना विक्री होत आहे.
डाळी, खाद्यतेल स्थिर
उन्हाळ्यामध्ये मागणी वाढल्याने डाळींच्या दरांत मोठी वाढ नोंदविली गेली होती. डाळींपाठोपाठ खाद्यतेलांचेही दर १५ किलोच्या डब्यामागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले होते. मात्र, आता महिन्याभरापासून डाळी आणि खाद्यतेल स्थिर आहेत. पुढील काही दिवस दर स्थिर राहणार असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
असे आहेत भाज्यांचे दर (प्रतिकिलो)
भेंडी – ७०
टोमॅटो – ६०
वांगी – ४०
गिलके – ५०
दोडके – ६०
हिरवी मिरची – २० ते ३०
गवार – ६० ते ७०
कोबी – १५
फ्लावर – १५
कोथिंबीर – ३०
मेथी – १५ ते २०
शेपू – २०
पालक – १०