श्री क्षेत्र नृसिंहवाडी; ‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’च्या अखंड नामस्मरणात लाखो भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै ।। दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत ‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’च्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा – पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. एक लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीने श्री दत्त मंदिर गर्दीने फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. स्नानासाठी व गुरुपूजनासाठी भाविकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. मुख्य मंदिर पाण्याखाली असल्याने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्तीचे भाविकांनी दर्शन घेतले. पूजेचे उपचार तिथेच पार पडले.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी ‘श्रीं’ना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली. दुपारी 12.30 वाजता ‘श्रीं’च्या उत्सवमूर्तीला महापूजा करण्यात आली. तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूक्तांचे पठण करण्यात आले. रात्री 9 वाजेनंतर दत्त मंदिरात धूप, दीप, आरती होऊन इंदुकोटी स्तोत्र व पारंपरिक पदे म्हणण्यात आली. गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून भाविकांनी हजेरी लावली होती. भाविकांनी गुरुचरणाचे दर्शन घेऊन गुरुपूजन तसेच जप, अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले.

भाविकांसाठी ग्रामपंचायतमार्फत पार्ंकग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, साफसफाई आदी सोयीसुविधा करण्यात आल्या होत्या. मेवा-मिठाई खरेदी करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *