महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवी दिल्ली – ता. ९ – लद्दाखच्या पूर्व भागात चीन आणि भारतादरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून तणाव आहे. आता हा तणाव निवळतांना दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच लेह-लडाखचा दौरा केला होता. त्याचबरोबर जखमी सैनिकांची भेटही घेतली होती. त्यामुळे चीनला कडक संदेश गेल्याचं मानलं जात आहे. त्याच बरोबर भारताने या भागात युद्ध सरावाला सुरूवातही केली होती. भारताच्या या आक्रमक रणनीतीचा परिणाम दिसून येत आहे. या दणक्यानंतरच चीनने गलवान नंतर आता हॉट स्प्रिंग भागातूनही आपलं सैन्य माघारी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लडाख जवळच्या हॉट स्प्रिंगमधल्या पाईंट 15 इथून भारत आणि चीनचे सैनिक 2 किलोमीटर मागे फिरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची बोलणी सुरू होती. त्यानंतर तणाव कमी करण्यासाठी सैनिक मागे घ्या अशी सूचना भारताने केली होती.
भारत कुठल्याही दबावाला आणि धमक्यांना घाबरणारा नाही आणि बळीही पडणार नाही असं भारतीय अधिकाऱ्यांनी चीनला स्पष्टपणे सुनावलं होतं. त्यामुळे तणाव वाढणार असं दिसताच चीनने आपलं सैन्य मागे बोलविण्याचा निर्णय घेतला.
पेंगाँग लेकच्या काही भागात अजुनही चिनी सैनिकांच्या हालचाली दिसून येत आहेत. या भागातले तंबू आणि गाड्या चीनने हटवल्या मात्र काही हालचाली आढळल्या आहेत. भारतीय अधिकारीही चिनी सैन्याची प्रत्येक हालचाल टिपत असून कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास लष्कर सज्ज असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.