खासदार अमोल कोल्हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे होम क्वारंटाईन झाले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ९ – दोन कोरोनाग्रस्त नेत्यांच्या संपर्कात आल्यामुळे शिरुर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी होम क्वारंटाईन व्हायचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती स्वतः अमोल कोल्हेंनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचेही कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे.

मी १ जुलै ते ४ जुलै या कालावधीमध्ये मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्कात आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाल्यानंतर स्वत:ची कोरोना चाचणी मी करुन घेतली, ती निगेटिव्ह आल्याचे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून मी विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालयमध्ये संपर्क करू शकता, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *