महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ओमप्रकाश भांगे – ता. ९ – पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. पुणे शहरात बुधवारी 1147 रुग्णांची वाढ झाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1618 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातही एकाच दिवसात 168 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32596वर पोहोचली आहे. कोरोनाचं हे वाढतं संकट लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले आहेत.
कोरोनाचा फैलाव वाढू लागल्याने शहरालगत हिंजवडी आणि मारुंजी परिसरात आजपासून 8 दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत.9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध,मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसंच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.
दुसरीकडे, हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी ,नऱ्हे,मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे,खानापूर,गुजर निंबाळकरवाडी,वडाची वाडी, लोणी काळभोर,भिलारे वाडी ,उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमाक वस्ती,कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.