![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ मार्च २०२६ ।। मार्च महिना संपायला अजून दिवस आहेत, पण बँकांच्या सुट्ट्यांचा हिशेब पाहिला तर ग्राहकांचीच धांदल उडण्याची वेळ आली आहे. पुढच्या आठवड्यात सण, परंपरा आणि विकेंड यांची अशी जुगलबंदी जमली आहे की काही ठिकाणी सलग चार दिवस बँकांचे दरवाजे कुलूपबंद राहणार आहेत. कागदावर बँका असल्या तरी खिडकीपाशी “आज सुट्टी आहे” हा बोर्ड पाहून परत फिरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पैशांची कामे, चेक क्लिअरन्स, कर्जाची कागदपत्रे किंवा इतर व्यवहारांसाठी बँकेत जाणाऱ्यांनी आता सावध व्हावे, असा इशारा जणू परिस्थितीच देत आहे. कारण गुढी पाडव्याचा उत्साह सुरू होण्याआधीच बँकिंग व्यवहारांची गुढी खाली पडू नये, याची खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे.
या सुट्ट्यांची मालिका विविध सणांमुळे तयार झाली आहे. १७ मार्च रोजी शब-ए-कद्र निमित्त काही ठिकाणी बँका बंद राहतील. त्यानंतर १९ मार्चला गुढी पाडवा, उगादी आणि तेलुगू नववर्ष यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँकांच्या शटर खाली जाणार आहेत. २० आणि २१ मार्चला ईदच्या निमित्ताने देशातील अनेक भागांत बँकिंग सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर २२ मार्च हा विकेंड असल्याने त्या दिवशीही नियमित कामकाज होणार नाही. म्हणजेच व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुट्टी जणू चार दिवसांची अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे. “उद्या जाऊ, परवा करू” म्हणत कामे पुढे ढकलणाऱ्यांना मात्र या सुट्ट्यांचा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.
याच महिन्यात पुढेही काही सणांमुळे बँकांचे दरवाजे अधूनमधून बंद राहणार आहेत. रामनवमी, चौथा शनिवार आणि महावीर जयंती यांसारख्या सुट्ट्यांमुळे मार्च महिन्यात बँकिंग व्यवहारांचे वेळापत्रकच बदलणार आहे. डिजिटल व्यवहारांची सोय असली तरी मोठ्या रकमेचे व्यवहार, कागदी प्रक्रिया किंवा काही अधिकृत कामांसाठी ग्राहकांना शाखेत जाणे भाग पडते. त्यामुळे शेवटच्या क्षणी धावाधाव करण्यापेक्षा बँकेची कामे आधीच पूर्ण करून ठेवणे अधिक शहाणपणाचे ठरणार आहे. अन्यथा सणांचा आनंद एका बाजूला आणि बँकेच्या बंद दरवाज्यासमोर उभे राहून केलेली खंत दुसऱ्या बाजूला, अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. मार्च महिन्याच्या या सुट्ट्यांनी ग्राहकांना एक धडा मात्र नक्की दिला आहे—पैशांचे व्यवहार आणि वेळ यांचा हिशेब चुकला, तर त्रास मात्र खात्रीचा!
