महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी विक्रमी १५,९४० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. निफाडच्या रेल्वे उड्डाणपुलासाठी पाच कोटी रुपये, कल्याण–इगतपुरी रेल्वे पुलासाठी १६.१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात मध्य रेल्वेसाठी एकूण योजना खर्च १०,६११ कोटी आहे. गेल्या वर्षी ही तरतूद १०,६०० कोटी होती. यात नवीन रेल्वेमार्गांसाठी १,९४१ कोटींची तरतूद असून, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ (२५० किमी)-२७५ कोटी, धुळे (बोरविहीर)- नरडाणा (५०.६ किमी) ३५० कोटी, पाचोरा-जामनेर (८४ किमी) ३०० कोटी तरतूद आहे.
५,८७७ किलोमीटरच्या नव्या मार्गिका
देशातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक निधी राज्यातील रेल्वेला देण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच ठिकाणी नव्या रेल्वेमार्गिका उभारण्याचे काम सुरू आहे. राज्यात ४१ प्रकल्पांनुसार ५,८७७ किलोमीटरच्या नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. यासाठी ८१,५८० कोटींची विकासकामे सुरू आहेत. राज्यातील अमृत भारत स्थानक योजनेनुसार १२८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. रेल्वे मार्गिकांचे दुहेरीकरण, तिहेरीकरण अशा कामांसह एकूण १ लाख ३ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू आहे. दरवर्षी १८३ किमी रेल्वे मार्ग जोडले जात असून रेल्वे वाहतूक करण्यात येत आहे. गेल्या दहा वर्षात ९२९ रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वेखाली पूल (आरयूबी) उभारण्यात आले आहेत, असा आढावा रेल्वे मंत्र्यांनी मांडला.