महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ फेब्रुवारी २०२६ ।। देशातील कोट्यवधी मेसेजिंग अॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा बदल समोर आला आहे. केंद्र सरकारच्या नव्या SIM-Binding नियमांनुसार, OTT मेसेजिंग अॅप्सवरील अकाऊंट संबंधित सक्रिय सिम कार्डशी जोडणे अनिवार्य होणार आहे. दूरसंचार विभाग Department of Telecommunications (DoT) यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिल्याचे वृत्त आहे. १ मार्चपासून या नियमांची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निर्णयाचा थेट परिणाम WhatsApp, Telegram सारख्या लोकप्रिय अॅप्सवर होणार आहे. मोबाईलमध्ये सक्रिय सिम कार्ड नसताना अॅप वापरणे, एकाच नंबरचे वेगवेगळ्या डिव्हाइसवर अनधिकृत वापर किंवा वारंवार सिम बदलणे यावर निर्बंध येऊ शकतात. नियमांचे पालन न केल्यास संबंधित अकाऊंट तात्पुरते निलंबित किंवा बंद होऊ शकते. तसेच WhatsApp Web वापरकर्त्यांना ठराविक कालावधीनंतर (सुमारे सहा तासांनी) पुन्हा QR कोड स्कॅन करून लॉग-इन करावे लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री Jyotiraditya Scindia यांनी युजर्सच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत डिजिटल फसवणूक आणि बनावट नंबरच्या माध्यमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. तज्ज्ञांच्या मते, या बदलाचा छोट्या व्यावसायिकांवर ६० ते ८० टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो, विशेषतः जे अनेक डिव्हाइसवर एकाच नंबरद्वारे व्यवसाय चालवतात.
डिजिटल सुरक्षेला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असला, तरी त्याची अंमलबजावणी कशी आणि कितपत प्रभावी ठरेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
