Pune News: पाऊस वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ होणार; पुण्यातील धरणांबाबत प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच दैना झाल्याचं पाहायला मिळालं. पुणे शहरातील बहुतांश भागांमध्ये काल पाणी शिरलं होतं. अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या होत्या आणि रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं होतं. धरणांमधून अचानक विसर्ग करण्यात आल्याने ही स्थिती उद्भवल्याचं सांगितलं जात आहे. अशातच पुणे शहरापासून जवळच असलेल्या तीन धरणांबाबत आज प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी ७ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे, यांच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे, लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कासारसाई धरणाच्या सांडव्यातून नालापात्रात विसर्ग कमी करून १२० क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाचा अंदाज आणि धरणातील येवा लक्षात घेता विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता-श्रेणी १, खडकवासला कालवा उपविभाग क्रमांक २, पुणे यांनी दिली आहे.

शहरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत
पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, १५ जनावरे दगावली; तर, मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटात तसेच लवासा येथे दरड कोसळली. बचावकार्यासाठी लष्कर तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. खडकवासलामधून होणारा विसर्ग नियंत्रित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे एका दिवसात तब्बल अडीच टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे, तर खडकवासला धरण काठोकाठ भरल्याने गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल एक टीएमसी पाणी सांडव्यातून सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुमारे चार हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *