महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर विधानसभेला मात्र राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत तयारीला लागण्याचे आदेश दिले. राज ठाकरेंच्या या आदेशानंतर मनसे कामाला लागली असून पुण्यातून पहिला उमेदवारही निश्चित झाला आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. युती आघाडीची वाट बघू नका, कोणत्याही परिस्थितीत आपली लोक सत्तेत असणार आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मनसे अध्यक्षांच्या या आदेशानंतर मनसैनिकांनीही विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
अशातच पुण्यातून मनसेचा पहिला उमेदवारही निश्चित झाला आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदार संघावर दावा केला असून त्यादृष्टीने तयारीही सुरू केली आहे. मी येत आहे हडपसरकरांच्या सेवेला असे म्हणत त्यांनी लक्ष हडपसर विधानसभा अशा आशयाचे स्टेटस ठेवत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
दरम्यान, याआधी हडपसर विधानसभा मतदार संघ हा मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागात येत होता. मात्र वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. तसेच ते सुद्धा हडपसरमधून आमदारकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कधीकाळचे कट्टर सहकारी असलेल्या दोन मनसैनिकांमध्येच विधानसभेची लढत होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.