प्रायोगिक तत्वावर १०वी, १२वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून सुरु – राज्यमंत्री बच्चू कडू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – :दि.१० : मुंबई : राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमुळे शालेय शिक्षण सुरु होण्यास अडचणी आल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करुन शिक्षण सुरु करणे गरजेचे आहे. यासाठी १०वी, १२वीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ जुलैपासून पाचवीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान, पहिली, दुसरीच्या ऑनलाईन शिक्षणावर बंदी आहे. तर सक्तीने शुल्‍क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरु करण्यासंदर्भात अमरावती येथे गुरुवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसंचालक अंबादास पेंदोर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांच्यासह पाचही जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरु होणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा सुरु करण्याचे नियोजन करावे. शाळा सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करुन इतरही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेण्यात यावा. यासाठी त्रयस्थ म्हणून गावातील सरपंच किंवा समिती सदस्यांची मदत घ्यावी, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *