Uran Murder Case: दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या ! यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। उरण येथे यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. दाऊद शेखला कर्नाटकमधील गुलबर्गा येथून अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे. या हत्या प्रकरणात दाऊद हा मुख्य आरोपी असल्याने त्याचा शोध पोलीस घेत होते. अखेर चार दिवसांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

उरण येथे रेल्वे स्टेशनजवळ यशश्री शिंदे हिचा मृतदेह झुडपात आढळून आला होता. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. उरणचे नागरिक यावरून आक्रमक झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. याप्रकरणी जवळपास आठ तपास पथके स्थापन करण्यात आली होती. अखेर दाऊद हा जाळ्यात अडकला आहे

दाऊदला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याने यशश्री शिंदेची इतकी निर्घुन हत्या का केली? असा प्रश्न लोकांना पडला आहे. तपासामध्ये याबाबत खुलासा होण्याची शक्यता आहे. यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेखचे नाव घेतले होते. तो गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता असं वडिलांनी सांगितलं होतं. त्यानंतर दाऊदचा शोध सुरु झाला.

दाऊद हा कर्नाटकच्या बेंगळुरुचा असल्याची माहिती मिळाली होती. शिवाय, दाऊद यशश्री शिंदेचा पाठलाग करत असल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. यात यशश्री ज्या रस्त्यावरून जात आहे त्याच रस्त्यावरून दाऊद जात असल्याचं दिसून आलं होतं. सीसीटीव्ही फुटेज दाऊदला शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. यशश्री शिंदे २५ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. २७ जुलैला तिचा मृतदेह आढळून आला होता.

यशश्रीच्या हत्येमुळे उरणच्या रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. उरणवासीयांनी निषेध मोर्चा देखील काढला होता. यादिवशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सर्व राजकीय पक्षांनी देखील याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *