महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। राज्यासह देशात परकीय गुंतवणूक वाढत असून रोजगारदेखील वाढत असल्याचा दावा राज्य सरकार, केंद्र सरकार वेळोवेळी करत असते. पण नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामुळे या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कारण देशात 7 लाख नोकऱ्या कमी झाल्याची माहिती रिपोर्टमधून समोर आलीय.कर्मचारी भविष्य निधी संस्थेने हा रिपोर्ट दिलाय.
कर्मचारी भविष्य निधी संस्था म्हणजेच ईपीएफओने एक अहवाल सादर केलाय. ज्यामध्ये महाराष्ट्रासह देशातील रोजगार किती प्रमाणात, कसे घटले? याची माहिती दिली आहे. 2023-24 मधील कमी झालेल्या नोकऱ्यांची आकडेवारी यात देण्यात आली आहे. त्यानुसार देशात एकूण 7 लाख नोकऱ्या कमी झाल्या आहेत. गेल्या 5 वर्षातील ही मोठी घट आहे.
भारतामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू,गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो. पण या राज्यातही नोकऱ्यांची घट झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात 2022-23 मध्ये 30.29 लाख नोकऱ्या होत्या. पण त्याच्या पुढच्या वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये हा दर 24.45 लाख इतका खाली आहे. म्हणजेच महाराष्ट्रात साधारण 19 टक्क्यांनी नोकऱ्या कमी झाल्या.
ईपीएफओच्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरात नोकरीवरुन काढलेले किंवा स्वच्छेने नोकरी सोडलेल्यांचे प्रमाण जास्त होते. हे प्रमाण यावर्षी 12.63 टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात दिसले. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या स्थितीचे वास्तव यातून समोर आलंय.
कोरोना काळानंतर नोकऱ्यांमध्ये फ्रेशर्सना मोठ्या प्रमाणात संधी मिळत होती. पपण आता नोकऱ्यांमध्ये घट होत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.2022-23 या कालावधीत फ्रेशर्सना 1.14 कोटी नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण 2023-24 मध्ये हा आकडा 1.9 कोटीवर आली. दुसरीकडे अनुभवी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 13.5 टक्के वाढ झाल्याची दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.