( औरंगाबाद ) संभाजीनगरात कडकडीत बंद हजारो पोलिस रस्त्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -आनंद चौधरी – ता. ११ : – संभाजीनगर -:करोना विषाणू संसर्ग थोपविण्यासाठी जाहीर केलेल्या संचारबंदीच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी (दहा जुलै) पोलिसांनी चौकाचौकांतील फिक्स पॉइंटवर वाहनधारकांची कसून तपासणी केली. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस रस्त्यांवर उतरले. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनीही शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला.

पूर्वीच्या ‘लॉकडाऊन’मध्ये बेशिस्त नागरीकांनी सहकार्य केले नसल्याचा अनुभव प्रशासनाला होता. या अनुषंगाने संचारबंदीची कठोर अंमलबजावमी करण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीपासून जय्यत तयारी केली होती. औरंगाबादमधील साडेतीन हजार पोलिसांपैकी अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या मदतीला साडेतीनशे होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) एक तुकडी तैनात करण्यात आली होती. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘फिक्स पॉइंट’ नेमण्यात आले होते. कमीत कमी पोलिस कर्मचारी ठाण्यात कामाला नेमून उर्वरित कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आणि विशेष शाखेचे कर्मचारी देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

औरंगाबाद शहरात १७ पोलिस ठाण्यांतर्गत सर्वच प्रमुख चौक आणि अंतर्गत भागात देखील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. येणारे-जाणारे, दुचाकीस्वार, चारचाकी चालक, रिक्षाचालक प्रत्येकाला अडवण्यात येत होते. ओळखपत्र दर्शनी भागात लावण्याच्या सूचना वाहनधारकांना देण्यात येत होत्या. वाहनांची कागदपत्रे, ओळखपत्रे यांची तपासण्यात येत होती. वाहनधारकाने सांगितलेले कारण पोलिसांना योग्य वाटल्यानंतरच संबंधितांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येत होती. पोलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये बहुतांश वाहनधारक हे बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी किंवा हॉस्पिटलमध्ये जाणारे नागरीक होते.

पूर्वीच्या ‘लॉकडाऊन’मध्ये पोलिसांना अनेक ठिकाणी विरोध झाल्याचे प्रकार घडले होते. या संचारबंदीच्या पहिल्या दिवशी मात्र पोलिसांना जास्त विरोध झाला नसल्याचे दिसून आले. कठोर संचारबंदी होणार असल्याची माहिती पूर्वीपासून नागरिकांना असल्याने पोलिसांना यावेळी आवाहन करण्याची गरज भासली नाही. कोकणवाडी चौक, सिल्लेखाना येथे पोलिसांसाठी ‘फिक्स पॉइंट’च्या परिसरात असलेल्या बँक; तसेच नागरी वसाहतीमधून पाणी, चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *