महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – ता. ११ -:नवी दिल्ली, 11 जुलै : गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीमध्ये शुक्रवारी झालेली वाढ ही कमी प्रमाणात आहे. तर चांदीचे दर आठवड्याच्या व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी उतरल्याचे पाहायला मिळाले. एचडीफसी सिक्युरिटीजने यासंदर्भात माहिती दिली आहे. याआधीच्या दिवसात मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्ये रोज वाढ पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये घसरण होत आहे.
शुक्रवारी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. सोन्याचे भाव 49,959 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरूवारी बाजार बंद होत असताना सोन्याचे भाव 49,951 रुपये प्रति तोळा होते. यामध्ये शुक्रवारी थोड्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होत आहे. या किंमती 1800 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होत्या.
गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, मात्र शुक्रवारी या सतत होणाऱ्या वाढीस काहीसा ब्रेक लागला आहे. शुक्रवारी चांदीचे दर 352 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी झाल्या.
परिणामी शुक्रवारी चांदीचे दर 52,364 रुपये प्रति किलोग्राम राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 18.60 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती.
याबाबत अधिक माहिती असणाऱ्या एका तज्ज्ञाच्या मते आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने IMF जागतिक वाढ खुंटण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे ते असे म्हणाले आहेत की, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेची अवस्था खूप खराब आणि चिंताजनक होण्याची शक्यता आहे. IMFच्या मते 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 4.9 टक्क्यांची घसरण होईल. अशाप्रकारे अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.
जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था कोलमडून टाकणारे हे कोरोना व्हायरसचे संकट कधी संपेल याबाबत काही अंदाज बांधू शकत नाही. तर दुसरीकडे अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक देखील येत आहे. या दोन्हींमुळे सोन्याला सपोर्ट मिळत आहे.