१४० नंबरने उडवली खळबळ; मुंबई पोलीस ‘त्या’ वाहिनीला दाखवणार हिसका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – ता. ११ -:मुंबई 11 जुलै : १४० आकड्याने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून फोन आल्यास घेऊ नका, आर्थिक फसवणूक होईल, अशी सूचना पोलीस वस्त्या-वस्त्यांमध्ये देत आहेत, अशा ध्वनिचित्रफिती शुक्रवारी संध्याकाळी समाजमाध्यमांवरून व्हायरल झाल्या आणि एकच घबराट पसरली. त्यानंतर ही एका वाहिनीवरील मालिकेची जाहीरात असून या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी तातडीने केले.

समाजमाध्यमांवर शुक्रवारी व्हायरल झालेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये पोलीस वाहनातून फिरताना दिसत असून पोलीस उद्घोषणा करीत आहेत. १४० आकड्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरचे आलेले फोन उचलल्यास बॅंकतील सर्व रक्कम काढली जाईल, असे या उद्घोषणेत सांगितले जात आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीने आपल्या नवीन मालिकेच्या प्रमोशनसाठी केलेले हे चित्रीकरण आहे. मात्र तसा कोणताच खुलासा यामध्ये नसल्याने खरेखुरे पोलीसच या सूचना करीत असल्याचे नागरिकांना वाटले आणि मोठा गोंधळ निर्माण झाला.

 

नागरिकांनी एकमेकांना समाजमाध्यमांवरून ही ध्वनीचित्रफित पाठवली. मात्र मुंबई पोलीस दलाने ही अफवा असल्याचे काही वेळातच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले. राज्याच्या सायबर विभागानेही तातडीने वाहिनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार लागलीच थांबवण्याची सूचना दिली. या प्रसंगाबाबत सायबर विभाग आपला अहवाल मुंबई पोलिसांना देणार आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून वाहिनीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *