महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। Paris Olympics 2024 Kolhapur Born Player To Play For Gold: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज दुपारी भारताला कोल्हापूरचा पठ्ठ्या आणखी एक मेडल मिळवून देण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये पात्रता फेरीमध्ये उत्तम कामगिरी करत सातवं स्थान मिळवलं. टॉप आठ खेळाडूंना पुढील फेरीसाठी म्हणजेच मेडलसाठी खेळण्याची संधी असून यामध्ये स्वप्निलचाही समावेश आहे. याच स्पर्धेमध्ये भारताचा ऐश्वर्य प्रतास सिंह तोमर 11 व्या स्थानी राहिल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आज स्वप्निल गोल्ड मेडलसाठी शुटींग रेंजमध्ये उतरणार आहे.
कशी राहिली स्वप्निलची कामगिरी
स्वप्निलने एकूण 590 गुांची कमाई केली. गुडघे टेकून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निल 198 (99,99) कमाई केली. तर प्रोन प्रकारामध्ये 197 (98,99) गुण मिळवले. उभं राहून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निलने 195 (98,97) गुण मिळवले. आज दुपारी एक वाजता या स्पर्धेची अंतिम फेरी होणार स्वप्निल असून अव्वल तीनमध्ये आल्यास भारताचं आणखी एक पदक निश्चित होणार आहे.
केवळ 4 गुणांचा फरक
विशेष म्हणजे पात्रता फेरीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या लियु युकूनपेक्षा स्वप्निलला केवळ 4 गुण कमी होते. युकूनने 594 गुण मिळवले. तर दुसऱ्या स्थानी राहिलेला नॉर्वेच्या जॉन हर्मन हेगने 593 गुण मिळवले. युक्रेनचा सेरहिय कुशिक, फ्रान्सचा लुकास क्रीझ, सर्बियाचा लाझारा कोवासेविच हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले. या सर्वांचे गुण 592 इतके होते. मात्र कितीवेळा त्यांनी अचूक लक्ष्यभेद केला यावरुन त्यांना स्थान निश्चित करण्यात आलं. चेक रिपब्लिकचा जिरी प्रिव्रतस्को 590 गुणांसहीत आठव्या स्थानी राहिला. ही आकडेवारी पाहिल्यास स्वप्निलला गोल्ड मेडल मिळवणही फारसं अशक्य नाही असं दिसून येतं.
धोनी कनेक्शन…
स्वप्निलचा आदर्श हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. धोनीच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असल्याचं स्वप्निलनेच सांगितलं आहे. पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर स्वप्निलनेच हा खुलासा केला. “मी रेंजवर असता मला फार गप्पा मारायला आवडत नाही. शांत आणि संयमी राहण्यास माझं प्राधान्य असतं. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी मला या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. मैदानामध्ये कितीही तणाव असला तरी तो शांत अन् संयमी असतो. मला हे फार भावते. मलाही अशाच पद्धतीने वावरायला आवडतं,” असं स्वप्निल म्हणाला. विशेष म्हणजे धोनी आधी ज्याप्रमाणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी म्हणून काम करायचा त्याप्रमाणे स्वप्निलही टीसीच आहे. कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.