Ration Card: ऑफलाइन रेशनला तात्पुरती परवानगी, धान्य वाटपानंतर भरावी लागणार ऑनलाइन माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। संभाजीनगर Ration Card: रेशन वाटपासाठीच्या सर्व्हरमध्ये महिन्याभरापासून तांत्रिक दोष निर्माण झाला. त्यामुळे धान्य वाटपाला अडचणी येत आहेत. नागरिकांना रांगेत उभे राहूनही धान्य मिळत नाही. त्यामुळे सर्व्हर दुरुस्ती होईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली धान्य वाटप करायला शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, वाटप झाल्यानंतर त्याची ऑनलाइन माहिती भरावी लागणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.

दर महिन्याला रेशनवरील धान्याचे वाटप ई-पॉश मशीनद्वारे करण्यात येते. नुकत्याच २-जी मशीन बदलून ४ -जी या अत्याधुनिक मशीन देण्यात आल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याने रेशनचे धान्य वाटप करण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे काही ठिकाणी निम्मेच वाटप झाले आहे तर काही ठिकाणी वाटप ठप्प आहे. ई-केवायसीची प्रक्रियाही केवळ ४० ते ४५ टक्केच झाली आहे.

त्यामुळे रेशन दुकानदारांनी सर्व्हर पूर्ववत सुरू होईपर्यंत ऑफलाइन नोंदी घेऊन रेशन वाटपाला परवानगी द्यावी; अन्यथा १ ऑगस्टला ई-पॉश मशीनची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यात रेशन दुकानदार संघटनेची मुंर्बइत बैठक झाली होती. या बैठकीत यावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर कक्ष अधिकारी आशिष आत्राम यांनी रेशन दुकानातून धान्याचे ऑफलाइन वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत.

अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाइन धान्य वाटप करण्यासाठी रेशन दुकाननिहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३१ जुलैपासून धान्याचे ऑफलाइन वाटप करण्याबाबत ई मेलद्वारे जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. रेशन दुकानांचे लॉगिन आयएमपीडीएस पोर्टलवर तयार करण्यात आले नसल्यास ते तत्काळ तयार करावे. सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणींचे निराकरण होईपर्यंत विशेष बाब म्हणून ऑफलाइन धान्याचे वाटपाला परवानगी देण्यात आली आहे.

नोंदी ठेवाव्या लागणार
धान्याचे वाटप ऑफलाइन करण्यास परवानगी दिलेली असली तरी त्यावर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लक्ष राहणार आहे. दुकानदारांनी वाटपाबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्या लागणार असून, याकाळात ऑफलाइन वितरित केलेल्या धान्याचा तपशील शासनाला सादर करावा लागणार आहे. वितरित केलेल्या धान्याचा तपशील पोर्टलवर भरावा लागणार असल्याचे जिल्हापुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *