महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। अरबी समुद्रात सौराष्ट्रालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याने दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामे उरकून घ्यावी तसेच शेतीकामांना जोर द्यावा, असं आवाहन देखील करण्यात आलंय. जून महिन्यात संपूर्ण राज्याकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात जोरदार हजेरी लावली. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहिले. परिणामी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला. मात्र, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाची शक्यता आहे. आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील विविध भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा?
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे.
मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘यलो अलर्ट’ आहे. उर्वरित विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.