महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट ।। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय. सभा, बैठका, दौरे आणि जागावाटप अशी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. मनसे पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याचं समोर आलंय.
मनसे पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघ लढवणार
मनसे पुणे शहरातील आठ ही विधानसभा मतदारसंघ लढवणार आहे. स्वतः राज ठाकरे (MNS) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती मिळत आहे. चार दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पुण्यात कोअर कमिटीची बैठक देखील घेतली होती. मनसेने शहरातील ८ विधानसभा लढवल्यास महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित बदलण्याची दाट शक्यता (Maharashtra Politics) आहे.
महायुतीचं टेन्शन वाढलं?
राज ठाकरे (Raj Thackeray) विधानसभेसाठी मैदानात उतरल्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढल्याचं चित्र आहे. मागील विधानसभेला मनसेमुळे भाजपला फटका सहन करावा लागला होता. आता पुन्हा भाजपला पुण्यात मनसेमुळे फटका बसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नुकतेच राज ठाकरेंनी विधानसभेसाठी कामाला लागा, असे मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिल्याचं समोर आलंय.
राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. इतकंच नव्हे तर राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा देखील घेतल्या होत्या. पण विधानसभा (Vidhan Sabha Election) स्वबळावर लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. यासाठी मनसेने मोर्चेबांधणी देखील सुरू केलीय. राज ठाकरेंचे दौरे, सभा, बैठका या घडामोडींना वेग आलेला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना देखील देत आहेत.