कोरोना लढाईत धारावीचे रोल मॉडेल संपूर्ण देशाला दिशा दाखविणारे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई :दि.१२ : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या . एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ऍक्टिव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.

या स्वयंशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्यांची उदहारणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.

धारावीचा कोरोनामुक्तीकडे प्रवास…
धारावीचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता… स्थानिक धारावीकर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पाहावे लागेल. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वयंशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते हेच धारावीमध्ये दिसून आले आहे.

उद्योग व्यवसायांचे माहेरघर धारावी
धारावीत चामडे व्यवसाय, कुंभारकाम, कापड व्यवसायाची संख्या फार मोठी आहे. परिसरात जीएसटीचे ५००० नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. एका खोलीत व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जवळपास १५ हजार आहे. आंतरराष्ट्रीय निर्यातीचे केंद्र म्हणून धारावीकडे पाहिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *