Sachin Waze On Anil Deshmukh : सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या …”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। Sachin Waze On Anil Deshmukh : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. यानंतर आता मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत”, असा गंभीर आरोप सचिन वाझे (Sachin Waze) यांनी केला आहे.

१०० कोटींचं खंडणी प्रकरण आणि २०२१ च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहे. मात्र, आता सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंना रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत हे गंभीर आरोप केले आहेत.

सचिन वाझे काय म्हणाले?
“जे काही घडलं आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे.

सचिन वाझे हे गेल्या काही मिन्यांपासून तुरुंगात असून त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. या प्रकरणात ते गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते माफीचा साक्षीदार बनले आहेत. त्यानंतर तुरुंगामधून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटळून लावली होती.

दरम्यान, सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ते काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *