महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। पुणे शहरात झिका व्हायरसने धुमाकूळ घालण्यात सुरुवात केली आहे. आतापर्यंत शहरात झिकाचे तब्बल 66 रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी 26 रुग्ण गर्भवती महिला आहेत. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे.
पुणे शहरात सुरुवातीला एरंडवणे भागात झिकाचे 4 रुग्ण आढळून आले होते. यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. त्यानंतर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात पुन्हा झिकाचे दोन नवीन रुग्ण आढळले. यानंतर शहरात झपाट्याने झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली.
डहाणूकर कॉलनी, पाषाण, आंबेगाव बु तसेच कर्वेनगर आणि खराडी परिसरातही झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले. झिकाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला.
रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, झिकापाठोपाठ शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, टायफॉइड या आजारांचा संसर्ग वाढलाय. त्यामुळे आगामी काळात डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
दोन वर्षांखालील आणि दहा वर्षांवरील मुलांमध्ये डेंग्यु होण्याचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये डेंग्यु वाढत असल्याचं समोर आलं आहे. अंगाला सूज येणे, प्लेटलेट्स कमी होणे, तीव्र डोकेदुखी, पुरळ येणे अशी लक्षणे नागरिकांमध्ये दिसून येत आहेत.
त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय.