Mla Disqualification : आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. आधी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी होईल. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवणार? की तसाच ठेवणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीनंतर दोन्ही पक्षांकडून आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकांवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा (Mla Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही.

त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही अस म्हणत ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली.

तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनीही कोर्टात याचिका दाखल केली. या दोन्ही याचिकेवर आज एकापाठोपाठ एक सुनावणी होणार आहे.

त्यामुळे सुप्रीम कोर्ट विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय फिरवून आमदारांना अपात्र करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, मागील सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला खडेबोल सुनावले होते.

तुम्हाला अपात्र का करू नये, असं म्हणत कोर्टाने त्यांना लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे अजित पवार गट कोर्टात काय उत्तर सादर करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दुसरीकडे आमदार अपात्रतेची सुनावणी मुंबई उच्च न्यालयात व्हावी, असं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *