महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली असून, 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार मोदी सरकारला आहेत. मोदी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यासाठी आम्ही त्यांना जे हवे आहे ते सहकार्य करायला तयार आहोत. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील, अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबात भाष्य केले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, “आज जे आंदोलक आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. यासाठी मी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मराठा आणि ओबीसी नेत्यांची बैठक बोलवण्याच भूमिका मांडली आहे. यावेळी मराठा समाजासाठी गेले काही महिने कष्ट घेणाऱ्या मनोज जरांगे यांनाही या बैठकीसाठी बोलवावे. तसेच ओबीसी नेते असलेल्या छगन भुजबळ यांनाही बोलवावे.”
पवार पुढे म्हणाले की, “50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. असे निकालही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची भूमिका केंद्र सरकारने घ्यावी, त्याला कोणताही विरोध न करत आम्ही पाठिंबा देऊ. या पद्धतीने मार्ग काढू आणि आपण आरक्षण मिळवू.”
यावेळी पवार यांना लाडकी बहिण योजनेबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, “सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे, त्यांनी अर्थिक विचार करुनच निर्णय घेतला असेल. कदाचित त्यांच्याकडे अतिरिक्त निधी असेल त्यामुळे ते आणखी चार योजनाही सुरू करू शकतात.” पुढे पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभेतही प्रचाराला यावे त्यामुळे आम्हाला फायदा होईल, असे म्हटले.