Rain Alert : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। देशासह राज्यातील हवामानात अनेक मोठे बदल झाले असून आज शनिवारपासून पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील आठवडाभर पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात पुढील 2 ते 3 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याच वेळी, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 ऑगस्टपर्यंत हलकात ते मध्यम पाऊस होऊ शकतो. दुसरीकडे जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने आज शनिवारपासून महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस
उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून श्रीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. परिणामी ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग शुक्रवारी दीड तासांहून अधिक काळ ठप्प होता. महामार्ग बंद झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

केदारनाथमध्ये पावसाचा कहर
केदारनाथमध्ये पावसाने अक्षरश: कहर केला असून अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी लिंचोली दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. गौरीकुंड-केदारनाथ पदपथावर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान, लिंचोलीतील ढिगाऱ्यांमधून तीन मृतदेह सापडले आहेत.

राजस्थानमध्ये तुफान पाऊस
राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. मासी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे शाळेला जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे 42 विद्यार्थी आणि आठ शिक्षक आणि कर्मचारी तब्बल 27 तास शाळेतच अडकून पडले होते . यानंतर गावकऱ्यांनी शाळेतच मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *