महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ ऑगस्ट ।। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य सरकारने सगेसोयरेची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अन्यथा सर्व आमदारांना पाडणार अशा इशाराच जरांगे यांनी दिला आहे. यासाठी ते अंतरवाली सराटी येथे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेत आहेत. पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचाही अहवाल मागवला आहे. कोणत्या मतदारसंघात किती मतदार आहेत आणि मतदारसंघाची काय गणिते आहेत हे जाणून घेतली जाणार आहेत.
पुण्यात ११ ऑगस्ट रोजी जरांगेंच्या शांतता रॅलीत लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी जरांगेंनी विधानसभा निवडणुकीत मराठा बांधव उमेदवार देऊ, अशी घोषणा केली होती.
पुणे शहरातील आठही मतदारसंघांचा अहवाल त्यांनी मागवला आहे. शिवाजी नगर, खडकवासला, कसबा, कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, पर्वती या मतदारसंघाचा समावेश आहे. लवकरच अहवालावर अभ्यास करून जरांगे-पाटील उमेदवारांची निवड करू शकतात. पुण्यातील मतदारसंघाची सगळी गणितं जाणून घेतली जाणार आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खान्देशातील 50 जागांवरही जरांगेंनी तयारी केलीय.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उभारलेल्या आंदोलनाला 29 ऑगस्टला वर्ष पूर्ण होतंय. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे या दिवशी जरांगे काय राजकीय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. लोकसभेत 23 उमेदवारांना पाडल्याचा दावा करत जरांगेंनी भुजबळ, धनंजय मुंडे आणि गिरीश महाजनांसह राज्यातल्या 113 आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय. लोकसभेचा अनुभव पाहता या इशा-यामुळे महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.