![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ फेब्रुवारी २०२६ ।। विमान प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला आहे. Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) ने तिकीट परतावा आणि बदलासंदर्भातील नियमांत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता तिकीट बुकिंगनंतर ४८ तासांच्या आत रद्द किंवा बदल केल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. २४ फेब्रुवारी रोजी सुधारित नागरी विमान वाहतूक आवश्यकता (CAR) जाहीर करत हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे.
काय आहे ‘लुक-इन ऑप्शन’?
नव्या नियमानुसार, बुकिंगनंतर प्रवाशांना ४८ तासांची ‘लुक-इन ऑप्शन’ सुविधा द्यावी लागेल. या कालावधीत तिकीट रद्द किंवा बदलल्यास एअरलाईनकडून अतिरिक्त रद्द शुल्क आकारता येणार नाही. मात्र, बदललेल्या उड्डाणासाठी लागू असलेले नियमित भाडे (फेअर) भरावे लागेल.
तथापि, देशांतर्गत उड्डाण बुकिंगनंतर ७ दिवसांच्या आत असेल किंवा आंतरराष्ट्रीय उड्डाण १५ दिवसांच्या आत असेल, तर ही सुविधा लागू होणार नाही.
नाव दुरुस्तीवरही सवलत
एअरलाईनच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक केल्यास आणि २४ तासांत नावातील चूक प्रवाशाने निदर्शनास आणून दिल्यास, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. ही तरतूद प्रवाशांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.
वैद्यकीय आणीबाणीमध्ये पर्याय
वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत तिकीट रद्द केल्यास एअरलाईनकडून परतावा किंवा ‘क्रेडिट शेल’ देण्याची तरतूद कायम आहे.
तिकीट परताव्याच्या विलंबाबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२५ मध्ये एकूण २९,२१२ तक्रारी नोंदल्या गेल्या, त्यापैकी ७.५ टक्के तक्रारी परताव्याशी संबंधित होत्या. नव्या नियमांमुळे प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि पारदर्शकता सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
