महाराष्ट्र 24: दिनांक -17 ऑगस्ट – पिंपरी चिंचवड : कोलकत्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) डॉक्टरांच्या संघटनांनी २४ तासांचा बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आज, शनिवार सकाळी सहा ते रविवारी (१८ ऑगस्ट) सकाळी सहापर्यंत बंद असणार आहेत. या काळातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी शहरातील रुग्णसेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे ‘आयएमए’सह डॉक्टर संघटनांनी स्पष्ट केले आहे.
कोलकत्यातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेचा निषेध करण्यासाठी देशारातील निवासी डॉक्टरांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आता या आंदोलनाला सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टरानी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. तसेच सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे गेल्या चार दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे; तसेच खासगी तपासणी केंद्रांतील कर्मचारी आणि डॉक्टरांनी या आंदोलनाला पाठिंबा आहे. शहरातील जवळपास 150 हुन अधिक डॉक्टरांनी भक्ती शक्ती येथे सकाळी 9 वाजता मूक मोर्चा द्वारे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला..