महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। आज रक्षाबंधनाचा पवित्र दिवस आहे. भाऊ बहिणींच्या नात्याचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. त्यामुळे राज्यात आज उत्साहाचे वातावरण आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधते अन् भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी टाकतो. अशात पुण्याच्या ऑटोरिक्षा चालकांनी मनाचा उदारपणा दाखवला आहे.
पुण्यात रक्षाबंधन निमित्त महिला प्रवाशांना रू 100 पर्यंत मोफत रिक्षा प्रवास दिला जाणार आहे. रक्षाबंधन निमित्त अनेक महिला भगिनी रेल्वेने कुटुंबीयांना भेटायला पुण्याला येत असतात. त्यामुळे ऑटोवाल्या भाऊने पुण्यात येणाऱ्या भगिनींना ओवाळणी देण्याचं ठरवलं आहे.
यंदा रक्षाबंधन निमित्त आज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथ वरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना रू. १०० पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत असणार आहे. तसेच त्यापुढील भाडे झाल्यास एकूण भड्यातून रू. १०० ची सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही चांगली ओवाळणी ठरणार आहे.
रिक्षाचालक बंधवातर्फे महिला प्रवाश्यांना रक्षाबंधनाची देण्यात येणारी ही छोटीशी भेट आहे. महिला प्रवाश्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असं आवाहन रिक्षा संघटनांनी केलं आहे. रिक्षा मित्र प्रीपेड बूथ, पुणे रेल्वे स्टेशन, तिकीट आरक्षण केंद्रासमोर आहे.
राज्यात आज उत्सवाचे वातावरण
आज राज्यभरात रक्षाबंधन उत्सव साजरा केला आहे. भाऊ आपल्या बहिणीकडे जात आहेत. विविध रंगाच्या आणि आकाराच्या अशा आकर्षक राखी ते लाडक्या बहिणींकडून बांधून घेत आहेत. बहीण या दिवसाची आतूरतेने वाट पाहत असते. कारण, या दिवशी हक्काने बहीण आपल्या भावाकडे ओवाळणी मागत असते. भाऊ देखील आनंदाने ही ओवाळणी देत असतो. एकंदरीत हा हिंदूंसाठी महत्त्वाचं सण असतो आणि ओवाळणीला देखील खूप महत्व असते.