महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळी मुसळधार पावसाच्या सरी झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी संध्याकाळी देखील पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. दरम्यान आज देखील राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज कुठे पाऊस होणार?
आज सोमवारपासून पुढील चार-पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. १८ ऑगस्टपासून पुढील ४,५ दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून साधारणपणे दुपारी/संध्याकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये वारे जोरदार असू शकतात तसेच झाडे पडणे वीजा पडणे, तीव्र सरीमुळे काही ठिकाणी खूप पाणी भरणे इत्यादी होऊ शकते अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.
18th Aug, पुढील ४,५ दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह ⛈️☔पावसाची शक्यता. साधारणपणे दुपारी/संध्याकाळी होण्याची शक्यता.
✔️ईम्प्याक्ट: वारे जोरदार असू शकतात.🌳झाडे पडणे, ⚡वीजां पडणे,तीव्र सरींमुळे काही ठिकाणी खूप 🌊पाणी भरणे इ. होऊ शकते.
✔️जिल्हा स्तरावर IMD Nowcast पहा pic.twitter.com/E8JRnVt1mm— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 18, 2024
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. परिणामी मुंबई, पुणे, कोकण, रायगड ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नगिरीसह उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आङे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातही पावसाची शक्यता आहे.
यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.