महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ ऑगस्ट ।। संपूर्ण हिंदुस्थानाचे धाकले धनी, वाघाचा छावा असणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आजवर अनेक चित्रपट येऊन गेले. त्यांच्या प्रचंड पराक्रमाची माहिती घराघरात पोहोचली पाहिजे या उद्देशाने हे चित्रपट बनवण्यात आले. मात्र संभाजी महाराजांचं चरित्र कायमच तितक्या तीव्रतेने मांडलं गेलं नाही. त्यामुळेच जेव्हा ‘छावा’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या ‘छावा’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. यातील प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे.
शिवा गेला पण त्याचा विचार सोडून गेला
या टीझरमध्ये सुरुवातीला गनीम आणि मावळयांमध्ये सुरू असलेली लढाई दिसत आहे. यात एंट्री होते ती छत्रपती संभाजी महाराजांची. घोड्यावर बसून जबरदस्त एंट्री घेणारा विकी कौशल सगळ्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसतोय. त्यात सुरुवातीला आपल्या कानावर पडतं, छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ म्हणतात आणि वाघाच्या बछड्याला छावा म्हणतात.’ त्यानंतर गनिमांवर तुटून पडणारा विकी कौशल दिसतोय. त्याने संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसून येतेय. त्यानंतर औरंगजेब दाखवण्यात येतोय. तो म्हणतो, शिवा गेला पण त्याचा विचार सोडून गेला. प्रदर्शित होताच या टिझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
‘छावा’ सिनेमाच्या टीझरवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. विकीच्या संभाजी महाराजांच्या लूकला आणि त्याच्या अभिनयाला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळतेय. येत्या ६ डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूूमिकेत झळकणार आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही विशेष भूमिकेत दिसणार आहे.