Maharashtra News: गव्हाचा तुटवडा भासल्यास रेशनवर तांदळाचा पुरवठा; गव्हाच्या कमी उत्पन्नाचा होणार परिणाम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ डिसेंबर।। Maharashtra News: यंदा राज्यात गव्हाचे कमी उत्पादन होण्याच्या शक्यतेने साधारण तीस टक्के गव्हाचा कमी पुरवठा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने स्वस्त दुकानदार त्रस्त आहेत. गव्हाचे नियतव्यय कमी होणार असल्यास त्या बदल्यात तांदूळ द्यावा, अशीही मागणी केली जाण्याची शक्यता आहे. (Supply of rice on ration in case of shortage of wheat news)

यंदा पंजाबसह देशात गव्हाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. धान्य वितरकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या नियमतव्ययात गव्हाची कपात होण्याचे संकेत आहेत. चालू महिन्याचा नियतव्यय आला नसला तरी साधारण मासिक गव्हाच्या नियतव्ययाच्या तुलनेत ३० टक्के गहू कमी दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

महिन्याला प्रतिमाणसी साधारण तीन किलो गहू दिला जातो, त्याऐवजी एकच किलो गहू द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत गव्हाऐवजी तांदूळ द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी ऑनलाइन धान्य वितरणाच्या यंत्रणेत तसा बदल करावा लागणार आहे. जिल्ह्यासह राज्यात धान्य वितरणाची प्रणाली ऑनलाइन आहे.

यंत्रणेत प्रतिमाणसी जेवढा कोटा आहे, तो संगणकीय प्रणाालीत आधीच असतो. त्यात ग्राहकांना परस्पर बदल करता येत नाही. त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून तांदूळ द्यायचे झाल्यास ऑनलाइन यंत्रात बदल करावे लागणार आहेत, असे स्वस्त धान्य वितरकांचे म्हणणे आहे.

दक्षिण भारतात तांदळाला मागणी असते. त्या तुलनेत महाराष्ट्रात तांदळाचा जास्त वापर होत नाही. त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून तांदूळ किती शिधापत्रिकाधारक स्वीकारतील हाही प्रश्नच आहे. पुरवठा विभागाकडूनच तसा निर्णय घ्यावा लागणार आहे. दरम्यान, अद्याप गव्हाच्या बदल्यात तांदूळ देण्याबाबत शासनाकडून पुरवठा विभागाला तशा सूचना आलेल्या नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *