महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत आणखी वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी जाऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. उमेदच्या माध्यमातून राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहेत. या संकल्पाची सुरुवात वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. अन्य महिलांच्या खात्यातही हळूहळू आधार सिडिंग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच पैसे जमा होतील, असे शिंदे म्हणाले.