चिखली भागातील गुंडा पुंडांना कोणाचा आशीर्वाद?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। चिखली या भागातील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, नेवाळेवस्ती व आजूबाजूच्या परिसरात सतत होणाऱ्या चोऱ्या, घरफोडी, मारामारी व वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. रात्रीच्या वेळी निर्धास्तपणे महिला या भागातून फिरू शकत नाही. चोरीच्या, गुंडा पुंडांच्या भीतीने नागरिक प्रचंड भीती आणि दहशतीच्या वातावरणात असून नक्की आम्ही पिंपरी चिंचवड शहरात राहतो का असा प्रश्न पडतो असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

चिखली, नेवाळेवस्ती, मोरेवस्ती या भागांमध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी नागरिकांनी मनातील खदखद बाहेर काढत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड आगपाखड केली. यावेळी कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक संजय नेवाळे, विनायक रणसूभे, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, यश साने आदी उपस्थित होते.

नागरिकांनी येथील गुंडगिरीचा मुद्दा उपस्थित केला. चिखली, मोरेवस्ती, साने वस्ती हा कामगार बहुल भाग आहे. मध्यमवर्गीय कामगारांना स्थानिक नेतृत्वाकडून भयमुक्त वातावरण, चांगल्या शाळांच्या सुविधा, ये जा करण्यासाठी चांगले रस्ते, पाणी या या गोष्टींची अपेक्षा होती . या सुविधांसाठी पिंपरी चिंचवड शहराचा अनेक राज्यांमध्ये लौकिक आहे. मात्र या लौकिकाला भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक नेतृत्वाने अक्षरश: मातीमोल केले आहे. अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. लाखो रुपयांचा फ्लॅट घेतला मात्र वेळेवर पाणी येत नाही अशी कैफियत यावेळी महिलांनी मांडली. चिखली परिसरात आणि रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यावरून ये जा करणे मुश्किल झाले आहे. भंगार गोदामांमध्ये वारंवार आग लागते. यामुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. रेडझोनचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. वारंवार आश्वासन दिले गेले. मात्र अजूनही रेड झोनची टांगती तलवार डोक्यावर कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षात या भागातील नागरिकरण जितक्या वेगाने वाढले. तितक्या वेगाने या भागाला सुविधा मिळालेल्या नाहीत. प्रशस्त रस्ते नाही, रेडझोनमुळे कारवाईची सतत टांगती तलवार डोक्यावर आहे. गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पाणी, वीज यांसारखे रोजच्या जगण्याचे महत्त्वाचे प्रश्न सतावत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या भागात अक्षरशः नागरिकांच्या घरात पाणी घुसले. ड्रेनेजची कोणतेही व्यवस्था या भागात सक्षमपणे केलेली नाही. गेल्या दहा वर्षांपासून तेच ते प्रश्न नागरिकांना सतावत आहे.

यश साने
– युवा नेते

चिखली, मोरेवस्ती, सानेवस्ती हा या भागामध्ये प्रचंड नागरिकरण वाढले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रेसिडेन्शियल झोन म्हणता येईल अशा प्रकारे हा भाग रहिवासीकरनाच्या दृष्टीने वाढत आहे. मात्र मूलभूत सुविधांची अक्षरशः वाणवा आहे. या भागात घरांची किंमत लाखो रुपयांच्या पुढे पोचली आहे. मात्र घरात पाणी नाही अशी अवस्था आहे. कागदोपत्री आकडेवारी सांगत, सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक प्रचार करत भाजपच्या स्थानिक आमदारांनी केवळ प्रसिद्धी मिरवली आहे. प्रत्यक्षात खड्डे, पाण्याची टंचाई, गुंडगिरी यामुळे या परिसराचा लौकिक बिघडत आहे. चिखली भागाला अक्षरशः बकालपणा आला आहे. गुंडगिरीला राजश्रय मिळत असल्यामुळे गुंडापुंडांची दहशत प्रचंड वाढले आहे. स्क्रॅप माफिया, आखाड पार्टीसारखी संस्कृती येथे पोहोचली आहे. यातून बाल गुन्हेगाराही तयार व्हायला लागले आहेत. घरफोडी, चोरी यांसारखे प्रकार सर्रास येथे होतात. मात्र पोलिसांच्या माध्यमातून या गुंडगिरीला आळा घालावा अशी मानसिकता येथील भाजप नेतृत्वाची नाही त्यामुळे या भागातील वातावरण गढूळ होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

-विकास साने
सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *