बदलापुरात जनजीवन पूर्वपदावर; आजपासून शाळा, इंटरनेट सेवा सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ ऑगस्ट ।। बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून बंद केली होती. आज गुरुवारी सकाळी पुन्हा इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील एकूण वातावरण पूर्वपदावर येत असताना पोलिसांनीही इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दैनंदिन आर्थिक व्यवहार गुगल पे, फोन पे च्या माध्यामातून मोबाईलद्वारे होत असतात, मात्र इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांची अडचण होत होती. शहरातील वातावरण पूर्णपणे निवळल्यामुळे पोलिसांनी आता इंटरनेट सेवा सुरू करण्यास मोबाईल कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहर पूर्वपदावर आलं असलं तरी शहरातील प्रमुख चौकात, रेल्वे पोलीस स्टेशन परिसर तसेच शाळेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्या शाळेत अनुचित प्रकार घडला ती शाळा आजही (गुरुवारी) बंद असून उर्वरित शाळांमध्ये मात्र नियमित वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी शहराला विस्कळीत झालेला दूध पुरवठाही सुरळीत झाला असून शहराचे एकूण जीवनमान आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र बदलापूरकरांच्या मनात असलेला रोष कायम असून प्रत्येक ठिकाणी याच मुद्द्यावर नागरिक चर्चा करत आहेत.

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर संतप्त आंदोलकांनी हल्ला केला. या हल्ल्यात घराची नासधूस करण्यात आली आहे. साहित्याची तोडफोडही करण्यात आली आहे. बदलापूर पूर्व परिसरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे परिसरातील पालक आणि नागरिकांत तीव संताप आहे. सध्या शिंदे हा पोलिस कोठडीत आहे. तो खरवई येथे राहत असल्याची माहिती मिळताच अज्ञातांनी त्याच्या घराची तोडफोड केली.

शिंदेचे वय केवळ 24 वर्षे असले, तरी त्याची तीन लग्ने झाली आहेत. मात्र, त्याच्या तिन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *