महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑगस्ट ।। मँचेस्टर कसोटीत श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव करत यजमान इंग्लंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह इंग्लिश संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात WTC गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या विजयासह इंग्लंडच्या खात्यात 12 गुण जमा झाले असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 41.07 झाली आहे. इंग्लिश संघाने दोन स्थानांची सुधारणा करत सहाव्यावरून चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. यासह, संघाने प्रथमच WTC फायनलसाठी दावा केला आहे.
डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलवर एक नजर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 68.52 असून हा संघ अव्वल स्थानी आहे, तर पॅट कमिन्सचा ऑस्ट्रेलियन संघ 62.50 च्या विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. किवींची विजयाची टक्केवारी 50 आहे. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 40 आहे. हा संघ पाचव्या स्थानावर आहे.
इंग्लंडचे किती सामने शिल्लक आहेत?
श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा आणखी एक सामना बाकी आहे. यानंतर इंग्लिश संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा दौरा करावा लागणार आहे. इंग्लंडने पाकिस्तानमध्ये 3-0 ने जिंकली होती. अशा परिस्थितीत जर इंग्लिश संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकली तर ते अंतिम फेरीतील आपला दावा आणखी मजबूत करू शकतात.
सामन्यात काय घडले?
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने पहिल्या डावात 236 धावा केल्या. श्रीलंकेकडून पहिल्या डावात धनंजय डी सिल्वा आणि मिलन रथनायके यांनी अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात जेमी स्मिथच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 358 धावा केल्या. जेमी स्मिथने 111 धावांची खेळी केली. श्रीलंकेने दुसऱ्या डावात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. कमिंडू मेंडिसचे शतक आणि चंडीमल आणि अँजेलो मॅथ्यूजच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 326 धावा केल्या. इंग्लंडला 200 हून अधिक धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठले.