Pune Porsche Car Accident: टीकेचा धुरळा खाली बसताच अग्रवाल कुटुंबाच्या हालचाली सुरु आधी पोर्शे कार मागितली, आता म्हणतात …..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। पुण्यातील कल्याणीनगर परिसरात भरधाव वेगात कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राच्या कुटुंबीयांनी याप्रकरणातील टीकेचा आणि रोषाचा धुरळा खाली बसताच हालचाली सुरु केल्या आहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला याप्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करता आली नव्हती. तसेच बालहक्क संरक्षण नियमांच्या आधारे हा धनिकपुत्र तुरुंगातून सुटला होता. मात्र, त्याचे आई-वडील सध्या तुरुंगातच आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

अशातच आता अग्रवाल कुटुंबीयांनी बालहक्क न्याय मंडळाकडे एक अर्ज केला आहे. त्यानुसार अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा पासपोर्ट परत द्यावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी अग्रवाल कुटुंबीयांनी ज्या कारची धडक बसून अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता, ती अलिशान आणि महागडी पोर्शे कार परत देण्याची मागणीही केली होती. बालहक्क न्याय मंडळासमोर बुधवारी या अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी बालहक्क न्याय मंडळाने या धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहण्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे पुढील सुनावणीत बालहक्क न्याय मंडळ काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

याशिवाय, मुलाला प्रौढ समजून त्याच्यावर खटला चालवण्यासाठी पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मात्र, बचावपक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल देत मुलाला प्रौढ ठरवता येणार नाही, असे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *